क्रेडिट कार्डमधून परस्पर 74 हजार रुपये काढले


। अहमदनगर । दि.21 फेब्रुवारी ।  डॉक्टर वापरत असलेल्या क्रेडिट कार्डमधून सायबर चोरट्यांनी परस्पर 74 हजार 250 रूपये काढून डॉक्टरांची फसवणूक केल्याची घटना शेवगाव येथे घडली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की शेवगाव येथील डॉ. मयूर सोनाजी लांडे (वय 34 रा. लांडेगल्ली, शेवगाव) हे 28 डिसेंबर 2021 रोजी वैजापूर येथून भाऊ मनोज यांच्यासमवेत रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास शेवगावकडे कारने येत होते. डॉ. लांडे यांच्याकडे भारतीय स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड होते.

 या कार्डमधून 14 हजार 850 रुपये कपात झाल्याचा त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यानंतर सलग अशा स्वरुपाचे पाच मेसेज येऊन खात्यातून 74 हजार 250 रुपये कपात झाले. त्यांनी या मेसेजचे मोबाईलवर स्क्रीनशॉट काढून घेतले व बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राकडे क्रेडिट कार्डमधून पैसे कपात झाल्याची तक्रार केली होती. पण त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. 

त्यामुळे डॉ. लांडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरील सायबर पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 66 (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार योगेश गोसावी पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post