। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । एप्रिल 2019 मध्ये अहमदनगर शहरातील लालटाकी परिसरात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी येथून अटक केली. संतोष बबन भारस्कर (वय 41 रा. लालटाकी, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
लालटाकी येथील माया वसंत शिरसाठ (वय 35) यांची पाथर्डी येथील बहीण भारती दीपक आव्हाड व माया शिरसाठ यांच्या शेजारी राहणारी सारीका संतोष भारस्कर यांच्या नातेवाईकांचे पाथर्डी येथे भांडण झाले होते.
या कारणावरून 10 एप्रिल 2019 रोजी दुपारी सारीका भारस्कर व त्याचे नातेवाईक नितीन विक्रम दिनकर, विक्रम लहानू दिनकर, मुकेश विष्णू दिनकर व इतर 14 ते 15 जणांनी माया शिरसाठ व त्यांची सासू बेबी अर्जुन शिरसाठ, दीर सचिन शिरसाठ, विनोद शिरसाठ, संतोष शिरसाठ व इतर नातेवाईकांना लाकडी दांडके, चाकू तलवारीने मारहाण करून बेबी शिरसाठ यांचा खून केला होता.
याप्रकरणी माया शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. यातील पसार आरोपी संतोष भारस्कर याला पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाणे, भीमराज खर्से, देवेंद्र शेलार यांच्या पथकाने पाथर्डी येथून ताब्यात घेतले व त्याला तोफखाना पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत. यानुसार या विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी यासाठी विशेष पथके नेमली आहेत. कटके यांनाच गुप्त बातमीदारा मार्फत भारस्कर हा पाथर्डी येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने
त्यांनी पथकाला पाठवले होते. या पथकाने आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीचा उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याला अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.