कोतवाली पोलिसांनी पहाटे केली धडाकेबाज कामगिरी, दोघांना अटक
। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । चोरुन आणलेले सुगंधी चंदनाच्या लाकडाचे तुकडे इनोव्हा गाडीमधून विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेल्या दोघांना कोतवाली पोलिसांनी सापळा रचून सोलापूर महामार्गावरील चांदणी चौकात पकडून गजाआड केले.
या दोघांकडून तब्बल 12 लाख रुपये किमतीचे चंदन लाकडाचे ठोकळे तसेच त्यांची गाडी व अन्य साहित्य मिळून 19 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सुभाष भीमराज दिलवाले (वय 47) व गाडीचा चालक राजेंद्र रंगनाथ सासवडे (वय 30, दोघे रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) यांना अटक करण्यात आली आहे.
दोनजण चोरुन आणलेले सुगंधी चंदनाच्या लाकडाचे तुकडे इनोव्हा गाडीमधून विक्री करण्यासाठी नगर शहरातून जाणार आहेत, अशी गोपनीय माहिती कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदारांना सापळा लावून कायदेशीर कारवाईचे आदेश दिले.
पथकाने चांदणी चौक ते जुन्या कलेक्टर ऑफीसकडे जाणार्या रोडवर सैनिक लॉनसमोरच्या परिसरात 24 फेब्रुवारी रोजी पहाटे सापळा लावला. चांदणी चौकात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पथकाने ही इनोव्हा गाडी (एमएच 12 जेयू 5644) अडवून त्याची तपासणी केली.
त्यात 370 किलो म्हणजे सुमारे 11 लाख 84 हजार रुपये किमतीचे चंदनाच्या लाकडाचे तुकडे आढळून आले. पोलिसांनी हा माल जप्त केला व सुभाष दिलवाले याच्यासह गाडीचा चालक राजेंद्र सासवडे यांना ताब्यात घेतले.
सुगंधी चंदनाची चोरी करुन इनोव्हा गाडीतून तस्करी करणार्या चंदनतस्करांच्या मुसक्या आवळण्यात कोतवाली पोलिसांना यश आले असले व चांदणी चौक परिसरात पहाटे सापळा रचून ही कारवाई केली असली तरी या दोघांनी हे चंदन कोठून आणले, याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात 12 लाखाचे चंदन तसेच 7 लाख रुपये किंमतीची इनोव्हा गाडी, 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन, 2 हजार 890 रुपये रोख असा एकूण 18 लाख 96 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस नाईक गणेश धोत्रे करीत आहेत. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलिस नाईक भिंगारदिवे व धोत्रे यांच्यासह नितीन शिंदे, सलीम शेख, संतोष गोमसाळे, सागर पालवे, राजू शेख, कॉन्स्टेबल अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाढे, सोमनाथ राउत, अतुल काजळे, बाबासाहेब तागड, प्रशांत बोरुडे यांनी केली.
चंदनाचे सुगंधित वृक्ष तोडण्यास बंदी असताना देखील दोनजण चंदनाचे वृक्ष बेकायदेशीर तोडून चोरुन आणलेले सुगंधित चंदनाचे लाकडाचे तुकडे हे त्यांच्याकडील इनोव्हा गाडीमध्ये भरुन वाहतूक करुन विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नगर शहरातील उड्डाण पुलाचे काम चालू असल्याने ते नगर शहरातून जाणार आहेत व चांदणी चौकाकडून जुने कलेक्टर ऑफीस रोड ते नालेगाव-अमरधाम नेप्ती चौकातून तेे कल्याण रोड मार्गे जाणार असल्याचे ही समजले होते. त्यामुळे पोलिसांनी चांदणी चौकाजवळ सापळा लावला होता. चांदणी चौकाकडून त्यांच्या दिशेने एक राखाडी रंगाची इनोव्हा गाडी येताना दिसल्यावर पथकाने ती गाडी थांबवली व त्यात चंदन चोरीचे मोठे घबाड गवसले.
Tags:
Breaking