। अहमदनगर । दि.10 फेब्रुवारी । श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद, गळनिंब, कुरणपूर, कडीत बुद्रुक, कडीत खुर्द व मांडवे ही लोणी पोलीस स्टेशनला जोडलेली सहा गावे श्रीरामपूर पोलीस स्टेशनला जोडावीत, अशी मागणी श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे यांच्याकडे केली. याप्रकरणी वळसे यांनी संबंधित अधिकार्यांना योग्य ते आदेश दिले आहेत.
यासंदर्भात वळसे यांना दिलेल्या पत्रामध्ये माजी आ.मुरकुटे यांनी म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्याचे विभाजन होऊन राहाता तालुका अस्तित्त्वात येण्यापूर्वी लोणी व प्रवरा परिसराचा श्रीरामपूर तालुक्यात समावेश होता. त्यावेळी वर नमूद सहा गावे ही लोणी पोलीस स्टेशनला जोडलेली होती. तथापि, आता राहाता तालुका स्वतंत्रपणे अस्तित्त्वात आला असून या सहा गावांचा कोणताही संबंध राहाता तालुक्याशी नाही.
ही सहा गावे श्रीरामपूर तालुक्यातच असल्याने संबंधित गावांच्या नागरिकांना श्रीरामपूर या तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कामासाठी यावे लागते.त्यामुळे सध्या लोणी पोलीस स्टेशनला जोडलेली ही सहा गावे श्रीरामपूर पोलीस स्टेशनला जोडण्यात यावी, अशी मागणी मुरकुटे यांनी केली आहे. यासंदर्भात मुरकुटे यांनी गृहमंत्री वळसे यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यावर वळसे यांनी सकारत्मकता दर्शविली असून संबंधित अधिकार्यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.