। मुंबई । दि.12 जानेवारी । राज्याच्या काही भागांत हवेतील बाष्पाचे कमी झालेले प्रमाण आणि त्याच वेळी उत्तरेकडून येणार्या थंड वार्यामध्ये झालेली वाढ, या कारणांमुळे थंडीचा कडाका वाढला असून आगामी दोन दिवस थंडीची तीव्रता टिकून राहील, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.
सध्या देशाच्या उत्तरेकडील पंजाब, काश्मीर, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, दिल्ली येथे थंडीची तीव्र लाट आली आहे. काही राज्यांत बर्फवृष्टीही सुरू आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणार्या थंड वार्याचा भाव राज्यात जाणवत आहे.
चार दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरावर असलेल्या चक्रवातामुळे बाष्पयुक्त वार्याचा प्रभाव विदर्भ, मराठवाड्यावर ढगाळ हवामान, हलका पाऊस, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पावसाच्या रूपाने जाणवला होता.
मात्र, उत्तरेकडून येणार्या थंड वार्याचा प्रभाव तीव्र असल्याने हवेतील बाष्प निघून गेले आहे. कोरड्या हवामानामुळे आकाशही निरभ्र झाले आहे. त्याचा परिणामही गारठा वाढण्यात झाला आहे. येत्या 48 तासांत हा प्रभाव टिकून राहण्याची शक्यता असल्याने 12 जानेवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका जाणवेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
राज्यात सोमवारी नाशिक येथे सर्वांत कमी 7.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव येथे 9 अंश तापमान नोंदवले गेले. राज्यात थंडीची तीव्रता उत्तर महाराष्ट्र, खानदेशात अधिक आहे. निफाड गहू संशोधन केंद्रात तर सोमवारी 6.1 इतक्या कमी तापमानाची नोंद झाली.
Tags:
Maharashtra