नगरची पत्रकारिता निर्भीड : पोलिस अधीक्षक पाटील

। अहमदनगर । दि.07 जानेवारी । नगर हा संवेदनशील जिल्हा आहे. येथे येणार्‍या प्रत्येक अधिकार्‍याला तसे सांगितले जाते. सामाजिक, राजकीयदृष्ट्यासह सर्वच क्षेत्रात ही संवेदनशीलता दिसून येते. त्याचे खरे कारण इथल्या पत्रकारितेत आहे. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची, चांगल्याचे कौतूक करण्याची येथील मीडियाची भूमिका आहे. हीच खरी पत्रकारिता आहे. निर्भीडपणा असेल तरच लोकशाही जिंवत राहू शकते, असे कौतुकोदगार पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी  काढले.    

दर्पण दिनानिमित्त अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सकाळचे आवृत्तीप्रमुख प्रकाश पाटील होते. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष दत्ता इंगळे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, नगर जिल्हा नेहमी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असतो. त्याचे खरे श्रेय येथील मीडियाला आहे. हल्ली तर ही पत्रकारिता खूप वेगवान झाली आहे. आमच्या पोलिस खात्यात आयबी, डीबीसारखे महत्त्वाचे विभाग आहेत. परंतु त्यांच्यापेक्षा निष्पक्ष माहिती आम्हाला मीडियाकडून मिळत असते. प्रशासनाला आरसा दाखवण्याचे काम येथील प्रसारमाध्यमे करीत असल्याचे त्यांचे कौतुक करावे लागेल.

पाटील म्हणाले, नगरचा सर्वच क्षेत्रातील ठेवा आदर्शवत आहे. पत्रकारितेला कोणतीच सीमा नसते. नवीन आव्हाने पेलताना पत्रकारांनी नव्या साधनांचा आधार घेतला पाहिजे. समाजशास्त्राचे विश्लेषण करीत पत्रकारिता करण्याची गरज आहे. पत्रकार व्यापक आणि चौकस असल्यास प्रगती होईल. शब्दकोश, पुस्तके वाचलीच पाहिजेत. तरच पत्रकार समृद्ध होतो. प्रसारमाध्यमांकडून चुका होत असतात. त्याही कबूल केल्या पाहिजेत. परंतु हल्ली तसे होत नाही.    

दिव्य मराठीचे ब्युरो चीफ अनिरूद्ध देवचक्के म्हणाले, इथल्या राजकीय नेतृत्वामुळे नगर नेहमीच चर्चेत असते. राज्यात काय घडणार, याची चुणूक आम्हाला पूर्वीच होते. विखे पाटील, थोरात, गडाख, घुले, काळे, कोल्हे अशा अनेक मातब्बर राजकीय घराण्यांमुळे राज्याचा इतिहास भूगोल बदलला आहे. त्या बदलाचे आम्ही साक्षीदार आहोत. जर्नालिझम बदलते आहे. चहूबाजूंनी पत्रकारांनी विचार केला तरच आगामी आव्हानांना आपण तोंड देऊ शकतो.        

लंके म्हणाले, दर्पणनंतर नगरमध्ये केवळ दहाच वर्षांत ज्ञानोदय सुरू झाले. तरवडीसारख्या ग्रामीण भागात मुकुंदराव पाटलांनी दीनमित्र सुरू केले. तेच खर्‍या अर्थाने पहिले ग्रामीण पत्रकार आहेत. त्यांनी केलेल्या पत्रकारितेचा आम्हा वारसदारांना अभिमान आहे. त्यांचीही जाणीव यापुढे सर्वांनी ठेवली पाहिजे. दा. प. आपटे, जणूभाऊ काणे, आचार्य गुंदेचा, वसंतराव देशमुख यांच्यासारख्या पूर्वसुरींनी ती समृद्ध केली. आपणही मतभेद विसरून एकत्र येत पत्रकार भवन उभारले पाहिजे. नवीन माध्यमांमुळे आपल्याला राष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी आहे. ठाकूर म्हणाले, नागरिकांसाठी विविध योजना असतात. तसेच पत्रकारांसाठीही त्या आहेत. या योजनांचा सर्व पत्रकारांनी लाभ घेतला पाहिजे. इंगळे म्हणाले, पत्रकार आणि छायाचित्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागूल यांनी केले. आभार प्रेस क्लबचे सहसिचव दीपक कांबळे यांनी मानले.  

यांचा झाला गौरव
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकार, संपादकांचा सत्कार करण्यात आला.  सुधीर लंके, शिल्पा रसाळ, अनिरूद्ध देवचक्के, सुभाष चिंधे, अशोक निंबाळकर, सूर्यकांत वरकड, सूर्यकांत नेटके, अरूण वाघमोडे, राजेंद्र उदागे, अ‍ॅड. सुभाष काकडे, अशोक जोशी आदींचा सत्कार करण्यात आला.  

पदोन्नती मिळालेले पत्रकार. सकाळ आवृत्ती प्रमुख- प्रकाश पाटील, प्रभात- जयंत कुलकर्णी, पुढारी- पुरूषोत्तम सांगळे, नवराष्ट्र- संदीप रोडे. अरूण वाघमोडे, चंद्रकांत शेळके, साहेबराव नरसाळे.

प्रेस क्लबची सामाजिक भूमिका
प्रास्ताविकात प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के म्हणाले, प्रेस क्लबने नेहमीच सामाजिक काम केले आहे. कोविडचा काळ आव्हानात्मक होता. त्यातही प्रेस क्लबने सामाजिक जाणीवेतून उपक्रम राबवले. आमचे दुःख बाजूला ठेऊन पत्रकारिता केली. नव्या माध्यमाची प्रिंट मीडियासमोर आव्हाने आहेत. ती पार करण्याची क्षमता प्रत्येक पत्रकारात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post