। अहमदनगर । दि.25 नोव्हेंबर । कंपनीत कामाची टाईम स्लिप भरण्याच्या कारणावरून सिनिअर इंजिनियरचे कंपनीतील कामगारांशी वाद झाले. या वादाचा मनात राग धरून एका कामगाराने त्याच्या दोन साथीदारांसह वीट, काठी व काहीतरी टणक वस्तूने बेदम मारहाण केली. ही घटना नगर-दौंड रोडवरील कायनेटिक कंपनीजवळील पांजरापोळ समोर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी की दौंड रोडवरील कायनेटिक कंपनीतील सिनियर इंजिनियर अभिजित चंद्रकांत शेटे (वय 27 रा.निंबोडी, तालुका नगर) यांचे कंपनीच्या दुसर्या पाळीत काम करताना रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास टाईम स्लिप भरण्याच्या वेळेच्या कारणावरून कंपनीतील कामगार ओंकार चव्हाण यांच्याशी वाद झाले.
त्या वादाचा मनात राग धरून ओंकार चव्हाण याने रात्री बारा वाजता कंपनीची ड्युटी सुटल्यानंतर त्याच्या दोन साथीदारांसह मोटार सायकल आडव्या घालून शेटे यांना पांजरापोळ समोर अडवले आणि ओंकार चव्हाण याने, तुला जास्त माज आला आहे, असे म्हणून उजव्या डोळ्यावर वीट मारून शेटे यांना जखमी केले तसेच त्याच्या एका साथीदाराने त्यांच्या डोक्यात टणक वस्तूने मारले तसेच दुसर्या साथीदाराने उजव्या हाताचे दंडाजवळ काठीने मारुन जखमी केले व तेथून निघून गेले.
मारहाणीत शेटे जखमी होऊन बेशुध्द झाले. शुद्धीवर आल्यावर त्यांचे मित्र विकास बनसोडे व करण रामफळे यांनी त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अभिजित शेटे यांच्या फिर्यादीवरून ओकार चव्हाण व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलिस नाईक राहुल गवळी करीत आहेत.