। अहमदनगर । दि.16 नोव्हेंबर । शेतकरी व दूध उत्पादकांना दोन पैसे मिळवून देणारा दूध धंदा आता अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरही दुधाच्या दरात कपात होत असल्याने शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दुधाला किमान 30 रुपये दर अपेक्षित असताना शेतकरी व दूध उत्पादकांना केवळ 20 ते 22 रुपये दर मिळत आहेे. गाई-म्हशीला लागणारा चारा, खुराक व इतर गोष्टींचा विचार केला तर शेतकर्यांच्या हातात काही शिल्लक राहत नाही.
दुधाच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा दूध उत्पादकांना होती. मात्र, दुधाच्या दरात अजूनही एक रुपया वाढ होण्याची चिन्हे दिसत नसल्याने व उलट दूध दरात कपात होण्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकर्यांनी आता हा दूध धंदा करायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्व दूध उत्पादक संघांनी दूध खरेदीचे दर घसरविल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने बाजारपेठा खुल्या केल्या. मंदिरे उघडली हॉटेल तसेच इतर व्यवसायही जोरात सुरू झाले.
दुधाची मागणीही वाढली मात्र दुधाचे दर मात्र कमी होत आहेत. दुधाचे दर 30 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच शेतकर्यांना दूध धंदा परवडतो. या पार्श्वभूमीवर दुधाचे दर कमी होण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेतकर्यांमध्ये अस्वस्थता पसरू लागली आहे.
Tags:
Ahmednagar