। अहमदनगर-पाथर्डी । दि.16 नोव्हेंबर । एसटी कर्मचार्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. आत्महत्याग्रस्त कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत देऊन एका पाल्याला मंडळाच्या सेवेत सामावून घ्यावे. निलंबनाची कारवाई तातडीने मागे घ्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आगारातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
कर्मचार्यांना पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी बंदला व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. भाजप, मनसे, वंचित बहुजन आघाडी, पालिका पदाधिकार्यांसह प्रवासी संघटना, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले.
वाजत गाजत, टाळमृदुंगाच्या तालावर शासनाच्या विरोधात घोषणा देत आगारापासून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयात आल्यावर तेथे निषेध सभेत रूपांतर झाले. कर्मचारी दत्तात्रय खेडकर, सुभाष खेडकर, सुनंदा मिसाळ, किरण गारुडकर, बाबा गायकवाड, किरण दहिफळे, प्रशांत रोडी, बंडू आंधळे, दीपाली रोडी, रोहिणी पालवे, राधा आबुज आदी कर्मचारी व सर्वांचे कुटुंबिय सहभागी झाले.
जोशपूर्ण घोषणा व महिलांच्या लक्षणीय संख्येमुळे आंदोलन अधिक प्रभावी झाले.भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शहराध्यक्ष अजय भंडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते गोकुळ दौंड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, वंचित आघाडीचे प्रा. किसन चव्हाण व अरविंद सोनटक्के, भाजप युवा मोर्चाचे अमोल गर्जे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर व सुनील ओहोळ आदींसह विविध पदाधिकारी सहभागी झाले.
चव्हाण म्हणाले, शासनाने एसटी कर्मचार्यांना तुच्छपणे लेखून त्यांची मानहानी बंद करावी. संपामुळे संपूर्ण राज्याचे जनजीवन ठप्प होऊन खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. संपूर्ण राज्याची सहानभूती कामगारांबरोबर आहे. तीन पक्षाच्या सरकारने संपा कडे दुर्लक्ष करून पंढरीची वारी बंद केली.आंदोलना विषयी बेताल वक्तव्य करणार्या परिवहन मंत्री अनिल परब व खासदार संजय राऊत यांचा निषेध करून त्यांच्या पुतळ्याचे दहन आंदोलन वंचित आघाडी तर्फे राज्यभर केले जाईल.
कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई हाती घेतल्याने सरकारने जनतेची सुद्धा सहानुभूती गमावली आहे. केवळ दोन तीन तास काम करणार्यांना लाखोंचा पगार तर जीव धोक्यात घालून रक्त ओकेपर्यंत काम करणार्याला, कामगाराला जगण्यासाठी सुद्धा पगार पुरत नाही. अशी विषमता संपवा. लवकरात लवकर आंदोलनाची दखल न घेतल्यास वेगळ्या पद्धतीने आंदोलनाची तीव्रता वाढवू.
दत्ता खेडकर म्हणाले, कामगारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी सरकारने पूर्ण करण्याऐवजी संप फोडण्यासाठी ताकद खर्च करत आहे. व्यापार्यांनी आम्हाला पाठींबा म्हणून बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला. प्रवासी संघटनेने सुद्धा सक्रिय पाठिंबा दिला आहे. शासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करून येत्या बुधवारी सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय भीक मांगो आंदोलन करणार आहेत. यावेळी नायब तहसीलदार श्री माळी यांनी निवेदन स्वीकारले.
Tags:
Breaking