। लंडन । दि.16 नोव्हेंबर । कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेचा मोठा तडाखा बसलेल्या युरोपियन देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली होती. मात्र आता नागरिकांच्या बेफिकिरीमुळे या देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यात ब्रिटनमध्ये चौथी तर फ्रान्समध्ये पाचवी लाट आली आहे.
त्याला आता वेळीच आळा घातला नाही, तर तेथे कोरोना पुन्हा उग्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाचा मोठा तडाखा बसलेल्या ब्रिटनमध्ये 1 लाख 42 हजार जणांचा या महामारीने बळी घेतले. येथील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तेथे लसीकरणावर भर देऊन लसीकरणाचा वेग वाढला होता.
सध्या तेथे 68.3 टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. 74.8 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. असे असताना तिथे कोरोनाची चौथी लाट आली आहे. फ्रान्समध्येही अशीच परिस्थिती आहे. तेथे 68.6 टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. 76.03 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. फ्रान्समध्ये 65 वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस दिला आहे.
त्यानंतरही तेथे कोरोनाची पाचवी लाट आली आहे. ब्रिटनमध्ये 50 वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे. असे असतानाही ब्रिटनमध्ये 4 टक्के आणि फ्रान्समध्ये 2.9 टक्के वेगाने कोरोनाचे संक्रमण पसरत आहे. ही दोन्ही देशांसाठी मोठी चिंतेची बाब आहे.
Tags:
Maharashtra