या घटनेची हकिकत अशी की, दि. 5 मार्च 2019 रोजी यश मनोज लोढा याने निखिल अशोक उपाध्ये यांच्या नवी पेठ (अहमदनगर) येथील घरसंसार गृहपयोगी दुकानामधून घेतलेल्या वस्तुवरून त्यांच्याबरोबर वाद करून त्यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेबाबत निखिल उपाध्ये यांनी यश लोढा याच्याविरुध्द त्याच दिवशी सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचार चालू असताना फिर्याद दिली. या फिर्यादीवरून यश लोढा याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी भादवि कलम 307 व 504 अन्वये गुन्हा दाखल केला व तपासाअंती आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांच्या न्यायालयात झाली. फिर्यादी पक्षातर्फे 4 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद व न्यायालयासमोर आलेल्या पुराव्याच्या आधारे आरोपी यश लोढा याला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अनिल सरोदे यांनी काम पाहिले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश जोशी यांनी मदत केली.
Tags:
Crime