थकीत वेतन मिळणार असल्याने... एसटीच्या कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार

। मुंबई । दि.13 ऑक्टोबर । राज्यातील एसटी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचा  थकीत वेतनाचा प्रश्न सुटला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमातंर्गत दुसर्‍या टप्प्यातील 231 कोटी 30 लाखाचा निधी मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय लगेट निर्गमित करण्यात आला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या 93 हजार कर्मचार्‍यांचा थकीत वेतनाचा प्रश्न सुटला आहे. लवकरच एसटी कर्मचार्‍यांना सप्टेबर महिन्याचे वेतन देण्यात येईल. थकीत वेतन मिळणार असल्याने एसटी कर्मचार्‍यांची दिवाळी चांगली जाणार आहे.

ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, या करीता गाव ते शाळा दरम्यान वाहतुकीची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ’मानव विकास कार्यक्रम’ अंतर्गत योजना राबविली जाते. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी दिला जातो.

या योजनेतंर्गत एसटी महामंडळाच्या बस वाहतूकीच्या खर्चापोटी राज्य शासनाकडून सन 2013-14 पासून रक्कम देणे प्रलंबित होते. तसेच इंधन किमतीची दरवाढ, चालनीय किलोमीटर तफावत, चालक आणि वाहक यांचे वेतनवाढ,

बसेसच्या देखभाल व दुरुस्तीचा वाढीव खर्च आदी विचार करुन पुर्वलक्षी प्रभावाने  2013-14पासून वाढीव दराने अनुदान देण्याबाबत मंत्री परब यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची वेळोवेळी बैठक घेऊन एसटी महामंडळास एकूण 428 कोटी 88 लाख 62 हजार 200 इतका निधी मंजूर करुन घेतला.

तो निधी देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मे, 2021 महिन्यात पहील्या टप्यातील 197 कोटी 58 लाख 40 हजार रुपायांच्या अनुदानाची रक्कम यापर्वीच एसटी. महामंडळाला मिळाली आहे.

दरम्यान, दुसर्‍या टप्प्यातील 231 कोटी 30 लाख 22 हजार 200 रूपयांचा निधी एसटी महामंडळाला देण्याबाबत निर्देश संबंधित विभागाला राज्य शासनाने दिले आहेत. या निधीमधून एसटी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वेतन मिळणार असल्यामुळे आता एसटी कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे एसटी कर्मचार्‍यांमधून स्वागत केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post