अन्नसुरक्षा योजनेत 1 जुलैनंतरच्या नावांचा समावेश करावा : कोल्हे

। अहमदनगर । दि.13 ऑक्टोबर । कोपरगाव शहर आणि विधानसभा मतदार संघातील 1 जुलै 2019 नंतरच्या नवीन व विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांच्या नावाचा समावेश अन्नसुरक्षा योजनेत करून त्यांना तातडीने शिधावाटप करावा, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

त्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, कोपरगांव विधानसभा मतदारसंघातील 1 जुलै 2019 नंतर अनेक नागरिकांनी नवीन तसेच विभक्त शिधापत्रिका धारण केल्या आहेत, मात्र त्यांना पंतप्रधान मोफत व राज्य शासनाचा शिधा मिळत नसल्याच्या असंख्य शिधापत्रिकाधारकांनी आपल्याकडे तक्रारी केल्या आहे.

त्याबाबत तहसीलदार विजय बोरूडे यांच्याशी देखील चर्चा केली आहे. सध्या कोरोना महामारीमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी या शिधापत्रिकाधारकांचा अन्नसुरक्षा योजनेत तातडींने समावेश करून त्यांना पंतप्रधान व राज्य शासन शिधा लाभ द्यावा. या मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे पाठविले आहे.

रेशनवाटप 10 तारखेच्या आत करावे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पंतप्रधान कल्याण व राज्य शासन अंतर्गत देण्यात येणारा शिधा स्वस्त धान्य दुकानदारांना उशिरा दिला जातो परिणामी स्वस्त धान्य लाभार्थी व दुकानदार यांच्यात विनाकारण वाद वाढत असल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणांत असून त्यांना हा शिधा दरमहा 10 तारखेच्या आत वितरीत करण्यात यावा, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी भुजबळ यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post