..आता अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका ; पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता

 


। मुंबई । दि.29 सप्टेंबर । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असतानाचा आता आरबी समुद्रावर चक्रीवादळाचा धोका संभवत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे. महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र थैमान घातल्याने ओला दुष्काळाची परस्थिती असताना आता आरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका वाढला असल्याने राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तर पावसाने थैमान मांडले आहे. काल दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे राज्यात 21 जणांचा बळी घेतला आहे. तसेच शेतात पाणी साचल्याने राज्यातील अनेक शेतकर्‍याचं अतोनात नुकसान झालं आहे. असं असूनही राज्यातील अस्मानी संकटं कमी होत नाही तोच आता बंगालच्या उपसागरानंतर आता अरबी समुद्रात देखील चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून जारी केलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा आहे. नाशिक आणि पालघर या दोन जिल्ह्यांत आज पावसाचा सर्वाधिक जोर असण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

दुसरीकडे, आज मुंबईसह, पुणे, रायगड, ठाणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या बारा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वार्‍यांचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात कमी अधिक फरकाने अशीच स्थिती राहणार आहे. पण विदर्भात पावसाचा जोर कमी होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post