देवळाली प्रवरा येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा
। अहमदनगर । दि.09 सप्टेंबर । देवळाली प्रवरा येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 1 लाख 10 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन एका महिलेसह पाच आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही धडकेबाज कारवाई डिवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार एएसआय राजेंद्र आरोळे, हेकॉ सुरेश औटी, पोना पंकज गोसावी, पोकॉ. नितीन शिरसाठ, राहुल नरवडे, सुनील दिघे गौतम लगड, मपोकॉ पूजा पवार, अनिता गीते आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
बुधवारी (दि.8) श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत. या खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी देवळाली प्रवरा येथे परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला. या छाप्यामध्ये 1 लाख 10 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन पाच आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
