। अहमदनगर । दि.04 जून । जेवणानंतर शतपावली करत असताना श्रीरामपुरातील महिला डॉक्टरचा मोबाईल हिसकावून नेण्याची घटना सूर्यानगर केके प्लाझा,वॉर्ड नं 7, श्रीरामपूर येथे घडली. या गुन्ह्यातील आरोपींचा पोलिस कसून शोध घेत असून गुन्ह्याचा तपास पोलिस करीत आहेत.
या घटनेची हकीकत अशी की, श्रीरामपूर येथील डॉ. शितल सुधाकर हिवरकर या रात्रीचे जेवण झाल्यानंतर त्यांच्या घरासमोर पायी फिरत असताना त्या ठिकाणी एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोनजण आले आणि त्यातील मागे बसलेल्या आरोपीने डॉ. हिवरकर यांच्या हातातील वीस हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला.
त्या दरम्यान झालेल्या गडबड़ीत तो फोन खाली जमिनीवर पडला. डॉक्टर शीतल यांनी तात्काळ त्यांचा मोबाईल फोन उचलून घेतला. त्यामुळे मोटारसायकलवर मागे बसलेल्या स्वाराने खाली उतरून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून त्यांना जोराचा धक्का देऊन रोडवर पाडले.त्यानंतर हे दोन्ही चोरटे पसार झाले.
या घटनेनंतर चोरट्यांनी अमरधामजवळील दहाव्याचा ओटा येथून प्रदीपकुमार सुचित सिंग सांगा यांचाही मोबाईल असाच हिसकावून नेला. या प्रकरणी डॉ. हिवरकर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 394,34 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेची हकीकत समजताच श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके तसेच शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानप यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्यातील आरोपींचा पोलिस कसून शोध घेत असून गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुरवाडे करीत आहेत.
