लाच घेताना तलाठी रंगेहात पकडला...

। अहमदनगर । दि.11 जून । जमिनीची वाटणी करून फेरफार नोंद लावण्यासाठी 20 हजारांची लाच मागणार्‍या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. गुरव पिंपरी  येथील हा तलाठी असून त्याला मिरजगाव येथे लाच घेताना पथकाने पकडले.

चंद्रकांत गजाबा बनसोडे (वय 56) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असणारा त्याचा साथीदार खासगी सहायक अमित सर्जेराव शिर्के (वय 40,रा.चांदा खुर्द,ता.कर्जत) हा पसार झाला आहे.

गुरव पिंपरी येथील शेतकर्‍याने त्यांच्या भावाच्या शेतीचे वाटणीपत्र करून त्या आधारे फेरफार नोंद करण्यासाठी गरव पिंपरी येथील तलाठ्याकडे अर्ज केला होता. ही नोंद करण्याच्या बदल्यात तलाठी बनसोडे व त्याच्या सहायकाने शेतकर्‍याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती.

परंतु 20 नसून 13 हजार देण्याची तडजोड झाली. संबंधित शेतकर्‍याने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दहा जूनला मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही रक्कम स्वीकारण्याची तयारी केली.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक  पथकाने सापळा लावून तलाठी बनसोडे यास 12 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. तलाठ्याचा खासगी सहायक मात्र अद्याप पसार झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post