। अहिल्यानगर । दि.27 जुलै 2026। इतर मागास प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत विविध स्वयंरोजगार व शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत असून, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत तसेच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या १३ उपकंपन्यांमार्फत जिल्ह्यात एकूण सहा योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये २० टक्के बीज भांडवल कर्ज योजना, एक लाख रुपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना यांचा समावेश आहे.
यापैकी एक लाख रुपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना तसेच महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना या पाच योजनांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. पात्र अर्जदारांनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. २० टक्के बीज भांडवल कर्ज योजना ऑफलाईन स्वरूपाची असून, तिचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत.
योजनांविषयी अधिक माहितीसाठी तसेच २० टक्के बीज भांडवल कर्ज योजनेसाठी ऑफलाईन अर्ज प्राप्त करण्यासाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी, नगर-मनमाड रस्ता, अहिल्यानगर येथील जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी ०२४१-२४५००३० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
