महावितरणचे मिशन आयपीडीएस’ यशस्वी : तब्बल 254 शहरांना दर्जेदार वीजपुरवठा सुरु

 महावितरणचे मिशन आयपीडीएस’ यशस्वी :

तब्बल 254 शहरांना दर्जेदार वीजपुरवठा सुरु


अहमदनगर  जिल्ह्यातील 9 शहरांचा समावेश


। नगर । दि.02 जून । राज्यातील 254  शहरांमध्ये वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची कामे महावितरणने पूर्णत्वास नेली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी विशेष लक्ष देऊन सातत्याने आढावा घेत या योजनेला गती दिल्याने राज्यातील तब्बल 1 कोटी 15 लाख शहरी वीजग्राहकांचा वीजपुरवठा आणखी दर्जेदार झाला आहे. यामध्ये अहमदनगर  जिल्ह्यातीलअहमदनगर,श्रीरामपूर,संगमनेर,शिर्डी,राहता,राहुरी,देवळाली प्रवरा,कोपरगाव,आणि श्रीगोंदा या 9 शहरांचा समावेश आहे.

शहरी भागातील वाढती ग्राहक संख्या व आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत (खपींशसीरींशव झेुशी ऊर्शींशश्रेिाशपीं डलहशाश-खझऊड) महावितरणने 44 मंडल अंतर्गत 254 शहरांमध्ये वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी विविध कामे सुरु केली. यामध्ये 2011 च्या जनगणनेनुसार 15 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची निवड करण्यात आली. 

 या शहरांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांना अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा करणे, नवीन वीजजोडण्या देण्यासाठी वीजयंत्रणेचे विस्तारीकरण, सक्षमीकरण व आधुनिकीकरण करणे तसेच वीजहानी कमी करणे व त्याच्या योग्य मोजमापासाठी म्हणजे ऊर्जा अंकेक्षणासाठी (एपशीसू र्Aीवळीं) ग्राहक व फिडरला योग्य क्षमतेचे मीटर लावणे आदी कामे करण्यात आली आहे.

गेल्या सव्वा वर्षातील कोरोना काळातील खडतर आव्हानाला सामोरे जात महावितरणने एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील 2300 कोटी रुपये खर्चाची कामे पूर्णत्वास आणली आहेत. यामध्ये प्रस्तावित 120 नवीन उपकेंद्रांपैकी 119 उपकेंद्र कार्यान्वित झाले आहेत तर 100 पैकी 100 उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्यात आली आहे. नवीन वितरण रोहित्रांचे 4 हजार 987 पैकी 4 हजार 970 कामे पूर्ण झाली असून प्रस्तावित सर्वच 4 हजार 207 रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात आली आहे. 

उच्च व लघुदाबाच्या 3 हजार 347 पैकी 3 हजार 42 किलोमीटर वीजवाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे तर तब्बल 6 हजार 694  किलोमीटरच्या भूमिगत वीजवाहिन्या व एरीयल बंचची कामे पूर्ण झाली आहे. सोबतच शहरी भागामध्ये 5 लाख 30 हजार 340 मीटर  बदलण्यात आले आहे.

महत्वाची आयपीडीएस योजना पूर्णत्वास गेल्यामुळे राज्यातील 254 शहरांमधील 1 कोटी 15 लाख 15 हजार 600 वीजग्राहकांना होणारा वीजपुरवठा आता अधिक दर्जेदार झाला आहे. ही कामे निर्धारित वेळेत व्हावी यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या योजनेशी संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांची वेळोवेळी बैठकी घेऊन या योजनेतील कामांचा आढावा घेतला. 

तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेऊन कामांना गती दिली. परिणामी महावितरणने आयपीडीएस योजनेतील सर्व कामे पूर्णत्वास नेत महत्वाची कामगिरी बजावली आहे.

देशात सर्वाधिक भूमिगत वीजवाहिन्या महाराष्ट्रात
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून महावितरणने देशात सर्वाधिक 4 हजार 364  किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या प्रस्तावित केल्या आणि त्याची कामे पूर्ण केली आहे. शहरी भागातील उपरी वाहिन्यांचे जाळे कमी करणे, यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाण कमी व्हावे तसेच शहराच्या सौंदर्यीकरणाला चालना देण्यासाठी योजनेत भूमिगत वाहिन्यांना प्राधान्य देण्यात आले. त्याप्रमाणे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भूमिगत वीजवाहिन्यांचे काम पूर्ण झाले, हे या योजनेचे वैशिष्ट्य ठरले आहे. भूमिगत वीजवाहिन्यांसाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र त्यावर मात करीत महावितरणने ही कामगिरी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post