घुसले पुन्हा पावसाचे पाणी
दुकानदारांचे आर्थिक नुकसान,
व्यापार्यांची महापालिकेकडे तक्रार
। अहमदनगर । दि.02 जून । दिल्ली गेट ते सिद्धिबाग दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले परंतु रस्ता उंच झाला आहे व रस्त्याच्या दोन्ही बाजूचे काम झाले नसल्यामुळे सोमवारी सायंकाळी पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे दुकानदारांच्या वस्तू खराब होऊन दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले.
सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने दिल्लीगेटजवळील काही दुकानांमध्ये पावसाचे पाणी जाऊन त्यांचे नुकसान झाले. अजून पावसाचे दिवस सुरू झाले नाही परंतु एका पावसामुळेच दुकानदारांचे हे हाल होत अशी तक्रार येथील व्यावसायिकांनी आ.संग्राम जगताप यांच्या केल्यानंतर
महापालिकेचे अभियंता श्रीकांत निंबाळकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून समस्या जाणून घेतली व लवकरात लवकर उपाययोजना करून पावसाचे पाणी गटारीमध्ये सोडू, असे आश्वासन गाळेधारकांना दिले. यावेळी सारंग पंधाडे,अमित ताकपीरे, अनिल गांधी, राजेंद्र गायकवाड,अक्षय जगताप,महेश गुंजाळ तसेच अन्य गाळेधारक यावेळी उपस्थित होते.
