राहता तालुक्यात 74 लाख रुपयांचा दारू साठा पकडला

। अहमदनगर । दि.29 एप्रिल । नगर जिल्हयातील राहाता तालुक्यात नगर-मनमाड रोडवर अस्तगाव फाटा येथे गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात व्रिकीस प्रतिबंध असलेला अवैध मद्यसाठा घेऊन जाणारी मालवाहतूक गाडी नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली. या कारवाईत 94 लाख 88 हजार रुपयांच्या अवैध दारु साठ्यासह मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गुडू देवीसिंग भिल (वय 35, रा.रामखेडी, खुडेल, जि.इंदोर,राज्य मध्यप्रदेश) असे पकडण्यात आलेल्या वाहनचालकाचे नांव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नगर राज्य उत्पादन शुल्क विभागास अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार विशेष पथके मागील तीन ते चार दिवसांपासून कार्यरतर करण्यात आलेले होते. दि.27 रोजी सकाळी मिळालेल्या महितीवरुन नगर-मनमाड रोडवर अस्तगाव फाटा (ता.राहता, जि.अहमदनगर) येथे गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात व्रिकींस प्रतिबंध असलेल्या अवैध मद्याची वाहतूक करता (क्र.एम.एच 18 बी.जी.5274) आयशर प्रो कंपनीच्या सहाचाकी ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये 94 लखा 88 हजार रुपये किंमतीचा दारु साठा मिळून आला.

या प्रकरणी दारुबंदी गुन्हा अन्वेषन शाखेत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावेळी वाहन चालक आरोपी गुड्डू देविदास भिल यास अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या रॉयल ब्यु व्हिस्कीच्या 180 मि.ली.च्या 57 हजार 600 बाटल्या (12 बॉक्सेस) किंमत 74 लाख 88 हजार व सहाचाकी वाहन आयशरची किंमत 20 लाख वाहतुक करताना जप्त करण्यात आले.

याकारवाईत एकूण 94 लाख 88 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यामध्ये आंतरराज्यात टोळी सक्रीय असण्याची शक्यता असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हयाचा तपास मुंबई दारुबंदी कायदा 1949 च्या अंतर्गत दुय्यम निरीक्षक एन.सी.परते करीत आहेत.

ही कारवाई राज्य शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता संचालक उमा वर्मा, पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर राज्या उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश जी पाटील, यांच्या सूचनेनुसार नगर प्रभारी उपअधीक्षक संजय सराफ, नगर निरीक्षक अनिल पाटील, बी.टी.घपोरतळे, ए.बी.बनकर, दुय्यम निरीक्षक एन.सी.परते, पी.बी.अहिरराव, डी.वाय.गोलकर, के.यु.छत्रे, एम.डी.कोंडे, एम.सी.खाडे, व्ही.जी.सूर्यवंशी, व्ही.बी.जगताप, तसेच भाऊसाहेब भोर, संजय साठे, मुकेश मुजमुले, एस.आर.वाघ.विकास कंटाळे, प्रवीण साळवे, नेहाल उके, के.के. शेख, वाहन चालक निहाले शेख, दीपक बेर्डे आदींच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post