। अहमदनगर । दि.01 मार्च । वारंवार गॅसची वाढ गगनाला भिडत आहे. फेब्रुवारी महिन्यातच सलग 3 वेळेस ही वाढ झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, गृहिणींना संसाराचा गाडा चालवणे अवघड झाले आहे. मोदींच्या केंद्र सरकारला अजिबात जनतेविषयी सहानुभूती नाही. त्यामुळे अखेर चूल मांडा आंदोलनाशिवाय आणि चूल मांडण्याशिवाय पर्याययच राहिलेला नसल्याचे मत राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे यांनी व्यक्त केले.
पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी हिवाळ्यामुळे ही वाढ झाल्याचा अजब दावा केला आहे. त्यामुळे संतापाची अधिकच भर पडली आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्य्क्षा रेश्मा आठरे यांच्या नेतृत्वाखाली मोदींच्या पेट्रोलपंपावरील बॅनरखाली चूल मांडा आंदोलन करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. यावेळेस अपर्णा पालवे, लता गायकवाड, शितल राऊत ,सुनिता पाचारने, शितल गाडे, उषा सोनटक्के, आलिशा गर्जे, शोभा तांदले आदी उपस्थित होत्या.
या महिन्यात सर्वप्रथम 4 फेब्रुवारी 2021 रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर दि.15 फेब्रुवारी रोजी पुन्हा 50 रुपयांची वाढ करण्यात आली. मग आता तिसर्यांदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या दरवाढीमुळे आता 14.2 किलोग्रॅम एलपीजी गॅस खरेदीसाठी ग्राहकांना 769 रुपये मोजावे लागणार आहेत जे 3 फेब्रुवारी रोजी 794 रुपये इतके होते. मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना 794 रुपये मोजावे लागणार आहेत.
वारंवार वाढणार्या किंमती या संतापजनक असून केंद्र सरकारला आता सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना महागाई कमी करणे जमत नसेल तर त्यांनी खूर्च्या खाली कराव्यात, जनतेची लुबाडणूक करू नये, असेही रेश्मा आठरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, चूल मांडा आंदोलनात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला असून हा उद्रेक दिल्लीपर्यंत पोहचवून केंद्र सरकारला धडा शिकल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्मा आठरे यांनी म्हटले आहे.