इंधन, गॅस दरवाढीच्या निषेधासाठी काँग्रेसचे मंत्री सायकलवरून विधानभवनात

। मुंबई । दि.01 मार्च ।  गेल्या काही दिवसात वारंवार इंधन आणि गॅसच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. यावर आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असुन कोँग्रेसने अनोख्या पध्दतीने आंदालन करुन काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरुन प्रवास करत विधानभवन गाठले.


यावेळी काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध करत ‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन प्रवास केला.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे सायकल आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेते आज सकाळी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमला. यावेळी त्यांच्या हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक होते.


काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर सायकलवरून विधानभवनाच्या दिशेने प्रवास सुरू केला.  यावेळी नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे सर्वच आमदार उपस्थित होते.


यावेळी नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. इंधन दरवाढीचा विरोध करत मोदी सरकार सत्तेत आले. पण याच सरकारने सर्वात जास्त इंधन दरवाढ करून देशातील जनतेची थट्टा केली. मोदी सरकारने शेतकर्‍यांना खोटी स्वप्नही दाखवली, अशी टीका नाना पटोले यांनी केली. महागाईने सर्व सामान्यांचं जगणं मुश्किल झालेलं असताना पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी थंडीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याचा दावा केला आहे. खरे तर ही शेतकर्‍यांची थट्टाच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post