कृषी वीज बिल माफीसाठी केले ‘रास्ता रोको’ आंदोलन

। अहमदनगर । दि.20 मार्च । शासनाने शेतकर्‍यांचे कृषी वीज बिल माफ करावे या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने शनिवारी (दि.20) सकाळी नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपुल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात छावा क्रांतिवीर सेनेकडून विविध मागण्या करण्यात आल्या. 

 

वाढीव एच.पी. चे बिल दुरुस्त करून नंतरच बिलाची आकारणी करावी, वीज कायदा 2003 नुसार शेतकर्‍यास होणार्‍या नुकसानीची भरपाई मिळावी, शेतीसाठी दिवसा वीज, रोहित्र दुरुस्ती, विद्युत वाहिन्या व खांबांची दुरुस्ती करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब बडे यांनी स्वीकारले. 

 

यावेळी भारतीय जनसंसदचे जिल्हा सरचिटणीस कैलास पटारे यांनी सरकारवर टीका करत निवडणुकीच्या वेळेस खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. 

 

यावेळी संघटक साईनाथ बोराटे, उपाध्यक्ष श्रीहरी लांडे, कार्याध्यक्ष बबन वाघुले, संतोष बोरुडे, बाळासाहेब काळे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे सपोनि युवराज आठरे व सोनई पोलीस स्टेशनचे सपोनि रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post