। मुंबई । दि.28 फेब्रुवारी । महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार येत्या 28 तारखेला निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदावर कुणाची वर्णी लागते याची चर्चा सध्या मंत्रालय आणि प्रशासनात होती. अखेर या पदासाठी राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
मुख्य सचिव संजय कुमार हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर आता या पदासाठी कुंटे हे पदभार स्वीकारणार आहेत. सीताराम कुंटे हे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदावर कार्यरत होते. आता त्यांची निवड मुख्य सचिवपदी झाली आहे. तर त्यांच्या जागी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनूकुमार श्रीवास्तव यांना संधी मिळाली आहे.
मुख्य सचिव पदासाठी संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर गेलेले प्रविणसिंह परदेशी आणि सीताराम कुंटे यांच्यामध्ये चुरस होती. त्यासाठी जोरदार लॉबिंगही सुरु होते. मात्र, या पदावर सीताराम कुंटे यांची निवड करण्यात आली. यावर्षी नोव्हेंबरमध्ये कुंटे हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या पदाचा कार्यकाळ 9 महिन्यांचा असणार आहे.
सीताराम कुंटे हे 1985 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. ते सध्या गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होते. त्यांनी विविध प्रशासकीय पदे भूषवली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून तर सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळला. तसेच 2012-2015 या कालावधीत त्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्तपदही स्वीकारले होते. आता त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झाली आहे.