। पुणे । दि.28 फेब्रुवारी । राज्याने अनलॉक प्रक्रियेच्या अंतर्गत मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली होती. मात्र कोरोना विषाणू पुन्हा फोफावत असल्याचं लक्षात घेवून राज्यसरकारने योग्य ते कठोर नियम लागू करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दि.2 मार्च रोजी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरातून दरवर्षी येणार्या सुमारे 3 ते 4 लाख भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये. यासाठी खबरदारी म्हणून मंगळवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. चतुर्थीच्या दिवशी भविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने भाविकांनी बाप्पांचं ऑनलाइन दर्शन घ्यावं, असे आवाहन केलं जात आहे. त्यामुळे गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या दिवशी www.dagdushethganpati.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.