। अहमदनगर । दि.14 फेब्रुवारी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत 24 डिसेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल 10 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला आहे. यामध्ये नगर तालुक्यातील बारदारी येथील दत्तात्रय ज्ञानदेव पोटे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
सध्या ते नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेत कर्तव्य बाजवत आहेत. यापूर्वी त्यांनी जामखेड पोलीस ठाणे, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फौजदार पदावर काम पाहिले. पोटे यांचे बंधूही पोलीस क्षेत्रात काम करताहेत. ते नगर तालुक्यातील बारदारी गावात राहत असून त्यांचे आई वडील शेती करतात.
खूप कष्टातून पोटे यांनी यश मिळविले आहे. सध्या ते नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेत काम पाहत असून त्यांनी अनेक प्रकारचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्या निवडी बद्दल जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.
