। अहमदनगर । दि.08 फेब्रुवारी । स्वच्छतेमधील सर्वोच्च फाईव्हस्टार मानांकनासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी शहरातील विविध भागा जाऊन स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करत आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून आपले शहर हे स्वच्छ, सुंदर व हरित होण्यास मदत होईल.
२0१९-२0 मध्ये भारत स्वच्छ अभियानामध्ये नगर महानगरपालिकेला स्टार मानांकन मिळाले असून, २0२०-२१ मध्ये फाईव्हस्टार मानांकन मिळविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी स्वच्छता अभियानात सरसावले आहे, असे प्रतिपादन घनकचरा विभागप्रमुख डॉ. नरसिंह पैठणकर यांनी केले.
भारत स्वच्छ अभियानांतर्गत अहमदनगर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी अधिकारी व कर्मचारी स्वच्छता मोहीम राबवत आहेत. यावेळी विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना पैठणकर म्हणाले की, स्वच्छता अभियानामध्ये मागील वर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे देशामध्ये ४0 व्या क्रमांकावर आपले शहर झळकले होते. आता यावर्षी फा्ईव्हस्टार मानांकन मिळविण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. त्यांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे द्यावी, जेणेकरुन शहराच्या नावलौकिकात भर
पडेल, असे ते म्हणाले.
सफाई कर्मचाऱ्यांबरोबर महापालिकेचे इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी जाऊन हातात झाडू घेऊन साफसफाई करतात. तसेच दगड, माती, फुटपाथ, गवत काढण्याचे केले जाते. या स्वच्छता अभियानात नागरिकांनीही सहभाग घेऊन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे.
