। अहमदनगर । दि.04 फेब्रुवारी । मोटारसायकलस्वारास रस्त्यात अडवून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खिशातील रोख रक्कम, मोबाईल तसेच सोन्याची चेन असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना मंगळवारी (दि.2) सायंकाळी 7.15 च्या सुमारास नगर-संभाजीनगर महामार्गावर कांगोणी गावच्या शिवारात घडली.
याबाबतची माहिती अशी की, रविंद्र राजेंद्र कदम (वय 25, रा.चांदा, ता.नेवासा) हे नगर-संभाजीनगर रोडने कांगुणी गावच्या शिवारात सुटके महाराज आश्रमाच्या पुढे आपल्या बजाज सिटी 100 मोटारसायकलने (क्र.एम.एच.17, बी.डब्ल्यू.4174) ने नेवासा फाटा ते चांद्याकडे जात असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या प्लॅटीना मोटारसायकलवर दोन इसम आले.
त्यांनी कदम यांच्या मोटारसायकलला त्यांची मोटारसायकल आडवी घालून ‘तू आम्हाला कट का मारला’ असे म्हणून शिवीगाळ केली तसेच खाली पाडून त्यांच्या खिशातील 13 हजार 500 रुपयांची रोकड असलेले पाकीट काढून घेतले.
या पाकीटात बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडियाचे दोन एटीएम कार्ड, आधारकार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन होते. याशिवाय त्यांच्या पोटाला रिव्हॉल्व्हर लावून त्यांच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल तसेच त्यांच्या गळ्यातील 2 तोळे वजनाची सोन्यची चेन असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला.
त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन मोटारसायकलवर बसून ते नगरच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी रविंद्र कदम यांनी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भा.दं.वि.क. 394, 341, 323, 504, 34, आर्म अॅक्ट कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
