। बीड । दि.27 फेब्रुवारी । पाली येथील आनंदग्राम येथे एचआयव्ही सह जगणार्या अनाथ मुला-मुलींच्या दोन जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे विवाह सोहळ्यात कोणत्याही धार्मिक पध्दतीने विवाह विधी न करता ‘वंदे मातरम’ या गीताचे गायन करत दोन्ही जोडपी विवाहबंधनात अडकली.
बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील इन्फंट इंडिया आनंदग्राम हा एचआयव्हीग्रस्त मुलांचा सांभाळ करणार प्रकल्प आहे. या प्रकल्पात संस्था संचालक दत्ता बारगजे, संध्या बारगजे यांच्या पुढाकारातून एचआयव्हीसह जगणार्या दोन जोडप्यांचा लग्न समारंभ पार पडला.
यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, आपणास या अनोख्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहता आले याचा आनंद वाटतो. राष्ट्रीय महामार्गापासून या प्रकल्पापर्यंत जोडणार्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून 50 लाख रुपये मंजूर केले असून पावसाळा सुरू होण्याच्या आत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल.
आनंदग्रामचे संचालक दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांनी स्व. डॉ.बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून एचआयव्ही बाधितांची सेवा करण्याचे, त्यांना सक्षम करून समाजात सन्मानाने जीवन जगण्याची संधी निर्माण करण्याचे सेवाव्रत हाती घेतले आहे. हे अत्यंत महान कार्य आहे.
आनंदग्राम ही संस्था आजपर्यंतच्या शासकांकडून दुर्लक्षित राहणे हे अनाकलनीय व दुर्दैवी असल्याचेही आहे. मात्र, यापुढे आपण आनंदग्रामसाठी शासकीय स्तरावर तर मदत करणार आहोतच शिवाय माझ्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी दरवर्षी या संस्थेला 5 लाख रुपयांची मदत देणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी जाहीर केले.