नगरमधील राष्ट्रीय महामार्गासाठी 35 कोटींचा निधी : खा.सुजय विखे पाटील

। अहमदनगर । दि.27 फेब्रुवारी ।  जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कल्याण, अहमदनगर, नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे 35 कोटी 42 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.


कल्याण आणि नांदेड या दोन प्रमुख शहरांबरोबरच विभागांनाही जोडल्या जाणार्‍या या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागावे म्हणून मागणी होती. जिल्ह्याच्या औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्राबरोबरच या मार्गावरून जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रस्थानी येणार्‍या प्रवासी वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन या महामार्गाचे काम गतीने होण्यासाठी खासदार डॉ. विखे पाटील यांनी रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. 

 

या रस्त्याच्या कामाच्या दाखल झालेल्या प्रस्तावास मंजुरी मिळून 35.42 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे खा. विखे पाटील यांनी सांगितले. मंजूर झालेल्या या निधीतून कल्याण चौक ते सक्कर चौक ( 6 कि.मी) आणि स्टेट बॅकेपासून ते चॉदबेबी महाल ( 10 कि.मी), चॉदबेबी महाल ते मेहकरी ( 4 कि.मी) अशा अंतराचे काम टप्प्याटप्याने पूर्ण केले जाणार आहे. 

 

या मार्गाला निधी उपलब्ध झाल्याने मोठ्या शहरांना जोडणार्‍या वाहतुकीलाही मोठी मदत होऊन जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रालाही या मार्गामुळे फायदा होईल. यामध्ये प्रामुख्याने नगर शहरातील रेल्वेपुलापासून ते सक्कर चौक या भागातील रस्त्याचे डांबरीकरण व रेल्वेपूल ते सीना नदी पत्रापर्यंत  काँक्रीट गटाराच्या कामाचा समावेश करण्यात आल्याचे  खा. विखे पाटील सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post