भारतीय हाच धर्म आणि माणुसकी हीच जात असल्याच बाळकडु लहाणपणीच आईवडिलांकडुन मिळाल्यानंतर धावणं असो वा जिंकणं आणि हारणंसुध्दा देशासाठी आणि लोकांसाठी अर्पण केलं जातं आणि म्हणुनच 'तिचं' जिंकणंसुध्दा तिने त्यावेळी आसामच्या पुरग्रस्तांच्या नावे केलं होतं म्हणुनच ती आसामाच्या मातीत धावणारी कालची पोरगी आसामच्या आणि भारताच्या मातीची झाली आहे.
थोड्याशा यशानं हुरळून जाऊन हवेत जाणारे आपण समाजात बघतो पण हिमालयाएवढ्या यशानंसुध्दा तिचे पाय अजून जमिनीवरच आहेत. ध्येयवेडानं पछाडणं म्हणजे नेमकं काय असतं हे व्हाटसअप, फेसबुक आणि मोबाईलवेड्या भारतीय मुलींनी हिमा दास हिच्याकडून शिकायला हवं आहे. ती ज्यावेळी जिंकली होती त्यावेळी एकीकडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची धुम चालु होती.
संपुर्ण देश त्याच धुंदीत रमला होता. आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट सुपर ३० बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होता. इकडे गावखेड्यांमध्ये अनेक मुली आईवडिलांच्या तोंडाला काळं फासुन 'सैराट' झाल्याच्या बातम्या ठळकपणे दोन दिवसांआड झळकत होत्या. कोणी कोणाच्या प्रेमासाठी गळफास लावून घेण्याचा अभद्रपणा करत होतं. कोणी कोणासाठी रात्र - रात्र व्हाटसअपवर गप्पा मारण्यात दंग होतं.
अनेक मुली रात्री बारापर्यंत आनलाईन असतात. मोबाईल वेड्या जमाण्यात मुलींचे वर्तन आॅनलाईन झाले असताना आसामच्या नागाव येथील धिग नावाच्या खेड्यातील एका भात शेतकऱ्याची एकोणवीस वर्षीय लढवय्यी युवती फिनलँडच्या मैदानावर उरात देशाची मान उंचावणारं स्वप्न नव्हे तर सत्य घेऊन ध्येयवेडानं धावत होती. तिची प्रत्येक धाव देशाची, आईवडिलांची मान उंचावणारी होती.
तिच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. क्रिकेट या 'तीन लाकडं आणि अकरा माकड' या इंग्रजांच्या श्रीमंत समजल्या जाणार्या खेळात भारताच्या हारण्याच्या दुखातुन क्रिकेटच्या वेड्यांनी अघोषित राष्ट्रीय दुखवटा पाळला होता. करोडो लोक दुखी झाले होतेे. इकडं हिमा मात्र जिद्दीने धावत होती. आणि तिच्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीला यश आलं. तरी तिच्याकडे लक्ष द्यायला लोकांना वेळ नव्हता. ती आली, ती धावली, तिनं जिंकलं. तिनं देशाला जिंकवत देशाची मान उंचावली.
सप्लिमेंट आणि प्रोटीनच्या जमान्यात जिचा फक्त दाळ भातावर पिंड पोसला गेला अशा हिमाने चौदाच दिवसांमध्ये हिमालयालाच नव्हे तर आकाशाला गवसणी घातली आहे. म्हणून आज ती देशाची हिरो झाली आहे. आपलं भाताचं शेत हेच मैदान बनवुन तिने भाताच्या शेतात धावायचा सराव केला. फाटलेल्या अशा स्वस्तातल्या स्पाईकस् घालुन तिनं सराव केला. धावण्याचा सराव करताना जिला कधी खेळातले शुज बघायला पण मिळत नव्हते .
अशा हिमा दासच्या नावाने जगात प्रसिद्ध असणाऱ्या अदिदास या कंपनीला आपला एक ब्रँड निर्माण करावा लागला हीच गोष्ट यशाचे हिमालय दाखवते. गावाकडची परिस्थिती फार वेगळी आहे. मोबाईल वेडानं मुलींना पछाडलं आहे. व्हाटसअप फेसबुकवर मुली सतत आनलाईन राहत आहेत. म्हणून या मुलींनी हिमाचा आदर्श घेण्याची गरज आहे. हिमाने देशाला जिंकवलं त्याचप्रमाणे गावखेड्यातील आणि शहरांतील मोबाईलवेड्या आणि टिकटॉकवेड्या मुलींनी चांगले वर्तन ठेवुन आपल्या बापाला जिंकवत त्याची जरी मान उंचावली तरी बरेच काही मिळवंल असं म्हणता येईल.
हिमा दास हिचा जन्म ९ जानेवारी २००० मध्ये झाला. धावण्याच्या वेडानं तिला झपाटलं होतं आणि त्यातुनच ती एक धावपटू बनली आहे. २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवलं होतं. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे. हिमा दासचा जन्म आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी गावात झाला.
तिचे वडील रणजित आणि आई जोनाली हे भातशेतीचे शेतकरी आहेत. ती एक भात शेतकर्यांची मुलगी असुन ती चार भावंडांमध्ये सर्वांत लहान होती. तिने धिंग पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली होती. ती आपल्या शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षण प्रशिक्षक श्यामशुल हक यांच्या सूचनेवरून हिमा दासने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
ती कमी व मध्यम अंतराच्या शर्यतींमध्येच भाग घेत होती. श्यामशुल हक यांनी तिचा नागाव स्पोर्ट्स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमा दास नंतर आंतर-जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण पदके जिंकली. जुलै २०१८ मध्ये फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.
तिने ५१.४६ सेकंदांची वेळ नोंदवली आहे. या कामगिरीमुळे ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती प्रकाशझोतात आली त्याचे कारण मात्र वेगळे आहे. ती आता आसामच्या पोलिस दलात उप अधीक्षक होऊन देशाची सेवा करणार आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी स्टार स्प्रिंटर हिमा दासला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. आपले बालपणीचे स्वप्न साकार होत असल्याचे या प्रसंगी हिमाने सांगितले.
माजी केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल यांनी हिमा दासला नियुक्ती पत्र दिले. राज्य शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलिस महासंचालकांसह, पोलिस विभागातील इतर अधिकारीही समारंभाला उपस्थित होते. डीएसपी म्हणून पदभार घेतल्यानंतर झालेल्या समारंभाला संबोधित करताना २१ वर्षीय हिमाने सांगितले की, तिने लहान असताना पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते ते आता पुर्ण झाले आहे. हिमा दासचा आदर्श देशातील तरूण तरुणींनी घेण्याची गरज आहे. हिमा दासचे खुप खुप अभिनंदन
लेखक
दत्ता पवार (मो- ९६५७६०८३३२)