राहता तालुक्यात लाच स्विकारताना तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

। अहमदनगर । दि.09 फेब्रुवारी । वडिलांचे व चुलत्यांचे नावे असलेल्या शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोडपत्र तयार करुन देण्याकरीता राहता तालुक्यातील खडकेवाके येथील तलाठी स्वाती गौतम मेश्राम ( वय  ३७ वर्ष, धंदा - नौकरी, रा. तलाठी, सजा केलवड, वर्ग ३,  ता. राहता, जि. अहमदनगर) यांना सहा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  रंगेहात पकडले आहे. दरम्यान, राहता तालुक्यात 24 तासात लाच घेण्याची ही दुसरी घटना आहे.


माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे खडकेवाके हद्दीतील वडिलांचे व चुलत्यांचे नावे असलेल्या शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोड पत्रा आधारे नोंदी घेऊन फेरफार देणे करिता यातील आरोपी लोकसेविका यांनी तक्रारदार यांचे कडे  7 हजाराची मागणी केली.


तक्रारदार यांना आरोपी लोकसेविका यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनीं  दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपीने पंचासमक्ष  7000/- ची मागणी करुन तडजोडीअंती  6 हजार लाचेची  मागणी केली. सदरची रक्कम आज दि. 09 फेबु्रवारी 2021 रोजी आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे कडुन पंचा समक्ष, केलवड तलाठी कार्यालय, ता. राहता येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.


ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंक नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलिस अधिक्षक नाशिक विभागाचे निलेश सोनवणे याच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक श्याम पवरे, पोलिस उपअधिक्षक हरिष खेडेकर, पोलिस हवालदार तन्वीर शेख, प्रशांत जाधव. चौधरी, विजय गंगुल, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, चालक हरुन शेख यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post