। अहमदनगर । दि.25 फेब्रुवारी । प्रवासी म्हणून बसलेल्या अज्ञात पाच इसमांनी वाहन चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्या गळ्याला टोकदार वस्तू लावून त्याच्या खिशातील एटीएम कार्ड, क्रेडीट कार्ड हिसकावून घेत चारचाकी वाहन पळवून नेल्याची घटना सोमवारी (दि.22) सकाळी 9 ते 11.45 वाजण्याच्या दरम्यान नांदगाव फाटा ते सुपा येथे घडली.
याबाबत दत्तात्रय खंडू हापसे (वय 32, रा.टाकळीमियाँ, ता.राहुरी) याने नगरमध्ये येवून कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दत्तात्रय हापसे यांचा प्रवासी वाहतूकीचा व्यवसाय आहे. नगर-मनमाड रोडवर नांदगाव फाटा येथे त्यांच्या वाहनात नगरकडे येण्यासाठी पाच अनोळखी प्रवासी बसले व त्यांनी वाहन चालक हापसे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्या गळ्याला टोकदार वस्तू लावली.
त्यांना पाठीमागील सिटच्यामध्ये दाबून धरुन सुपा येथे नेले. तेथे गेल्यावर त्यांच्या खिशातील एटीएम आणि क्रेडीट कार्ड काढून घेतले तसेच दमबाजी करुन पासवर्ड विचारला त्यानंतर त्यांना तेथेच सोडून देवून वाहन घेऊन पोबारा केला. या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात पाच इसमांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.