अहमदनगर जिल्ह्याचा देशपातळीवर सन्मान

 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल

अहमदनगर जिल्ह्याचा देशपातळीवर सन्मान

भौतिक तपासणी संवर्गातील कामगिरीबाबत केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांच्याहस्ते गौरव

          जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह सहकार्‍यांनी स्वीकारले सन्मानपत्र   
             


। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक तपासणी संवर्गात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यास प्राप्त झाला. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी नवी दिल्ली येथे आज (बुधवारी ) हा पुरस्कार स्वीकारला.


प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील उत्कृष्ट  कामगिरी बजावणार्‍या जिल्ह्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री श्री. तोमर यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यास हा सन्मान प्रदान करण्यात आला. राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचीही यावेळी उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी डॉ. भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी श्री. निचित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी साठी जिल्ह्याला हा  पुरस्कार मिळाला. योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी 5 टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी विहित मुदतीत केल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 6 लाख 98 हजार 914 एवढी आहे. 

 

या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत 719 कोटी 58 लाख 70 हजार एवढा निधी पोर्टलद्वारे जमा करण्यात आलेला आहे. भौतिक तपासणी साठी 28 हजार 802 एवढया लाभार्थ्यांची यादी पोर्टलद्वारे प्राप्त झाली होती. त्याचे कामकाज जिल्ह्याने शंभर टक्के पूर्ण केले. या 28 हजार 802 लाभार्थ्यांपैकी 26 हजार 612 लाभार्थी पात्र असुन, 2 हजार 190 लाभार्थी अपात्र ठरले आहेत.


योजनेतील 2 लाख 57 हजार एवढया लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्याचा 101125 इतका डाटा दुरुस्त करण्यात आला आहे. तसेच तक्रार निवारणासाठी 2 हजार 249 एवढ्या तक्रारी प्राप्त होत्या त्याचे 100 टक्के निराकरण करण्यात आले आहे. आयकर भरणारे व इतर कारणामुळे अपात्र झालेल्या लाभार्थ्यांकडून 9 कोटी 19 लाख 56 हजार इतक्या रकमेची वसूली करण्यात आली.  

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे कामकाज करतांना सर्व तालुकास्तरीय यंत्रणेचा दैनंदिन आढावा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आमि वेळोवेळी बैठकीद्वारे घेण्यात आला. त्यानंतर दैनंदिन कामकाजानुसार तालुक्यांचे अनुक्रम ठरविण्यात आले व त्यानुसार आढावा घेण्यात आला.  विशेष म्हणजे, कोरोना सारख्या आपत्तीजन्य परिस्थितीतही तालुका स्तरावर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी योजनेचे कामकाज ठरवून दिलेल्या उद्दिष्टांनुसार पूर्ण केले. या कामाची दखल थेट देशपातळीवर घेण्यात आली.


जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नोडल अधिकारी म्हणुन निवासी उपजिल्हाधिकारी श्री निचित, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री जगताप, राष्ट्रीय सूचना केंद्राचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर, तहसीलदार एफ.आर. शेख, शरद घोरपडे व श्रीमती सुनिता ज-हाड, नायब तहसिलदार श्रीमती वरदा सोमण, अव्वल कारकुन संदेश दिवटे व आय.टी. असि‍स्टंट रोहित शिंदे यांनी जिल्हास्तरावर कामकाज पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post