राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार सीताराम कुंटे यांनी स्वीकारला

। मुंबई । दि.28 फेब्रुवारी ।  राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवनियुक्त मुख्य सचिव कुंटे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

 

तर मावळते मुख्य सचिव संजय कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर श्री. कुंटे यांनी श्री. संजय कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला.


सुमारे २२ वर्षांपूर्वी ज्या मुख्य सचिव कार्यालयात  कुंटे यांनी सहसचिवपदी काम केले त्या ठिकाणी ते मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी विविध विभागांच्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.


भारतीय प्रशासन सेवेतील १९८५ च्या तुकडीचे असलेले  कुंटे मूळचे सांगली येथील असून एम.ए (अर्थशास्त्र) आणि एलएलबीपर्यंत शिक्षण झाले आहे. १९८६ मध्ये जळगाव येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून श्री. कुंटे यांची प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी धुळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे म्हणून त्यांनी काम पाहिले.


२०१२ मध्ये ते मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले. त्यानंतर पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, अल्पबचत आणि लॉटरीचे आयुक्त (अतिरिक्त कार्यभार), प्रधान सचिव (व्यय) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. उच्च व तंत्रशिक्षण, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. २७ ऑगस्ट २०२० पासून ते गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते.

Post a Comment

Previous Post Next Post