। लंडन । दि.28 फेब्रुवारी । ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 17 मेपर्यंत बंदी घातली आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठी येणार्या प्रवाशांनाच येथे परवानगी दिली जाणार आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि पर्यटनाला बसला आहे. त्यानंतरही कोरोनाच्या विषाणूने बदललेले रूप अतिशय धोकादायक असल्यामुळे ब्रिटनने येथील आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध आणखी कडक केले आहेत. त्यात येत्या 17 मे पर्यंत अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त कोणालाही ब्रिटनमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे पंतप्रधान जॉन्सन यांनी म्हटले आहे.
सोमवारी इंग्लंडमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 41 लाखांवर गेली. आतापर्यंत ब्रिटनमध्ये 1 लाख 20 हजार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत इंग्लंडमध्ये 1 कोटी 72 लाख लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे. कोरोनामुळे ब्रिटनमध्ये तिसर्यांदा लॉकडाऊन करावा लागला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणखी नवीन उपाय योजना केल्या जातील, असेही पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी म्हटले आहे.