जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसह 50 सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार

। अहमदनगर  ।  दि.11  फेब्रुवारी ।  नगर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसह जिल्ह्यातील 50 विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम 22 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठविल्यानंतर पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेसह तीन कारखाने व अठरा सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम सुरू झालेला आहे.


यातील तीनही कारखाने बिनविरोध झाले आहेत तर जिल्हा बँकेची निवडणूक 20 फेब्रुवारीला होत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात प्राधान्याने या सहकारी संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आता राज्य शासनाने नव्याने आदेश काढत गतवर्षी मुदत संपलेल्या इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे जाहीर केलेले आहे.


त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने बुधवारी (दि. 10) सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नगर जिल्ह्यातील 50 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम 22 फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post