। अहमदनगर । दि.08 फेब्रुवारी । सरकारी वकील गोरक्षनाथ मुसळे यांचा कायनेटीक चौक येथील बंगला फोडून चोरट्यांनी 50 तोळे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन ते पावणेसहाच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मुसळे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे इंटर लॉक आणि लाकडी चौकटीचा लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. 5 लाख 7 हजार रूपये किंमतीचे 50 तोळे व 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेला. मुसळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि पवार करीत आहेत.
दरम्यान, शहर व उपनगरात दररोज घरफोड्या होत आहेत. मागील आठवड्यात पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील पानटपरी चोरट्यांनी फोडली होती. त्यानंतर रविवारी सरकारी वकिलाच्या बंगल्यात चोरी झाली. चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.
