। अहमदनगर । दि.10 जानेवारी । अज्ञात वाहनाची धडक बसून दोन युवक ठार झाले. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री 9 ते 10 च्या सुमारास तालुक्यातील नगर-दौंड या महामार्गावर काष्टी येथील हॉटेल शिवनेरीजवळ घडली.
अजय वाळुंज (22, टाकळी कडेवळी, ता. श्रीगोंदे) व पवन योगेश खरात (12, काष्टी, खरातवाडी) अशी मृतांची नावे आहेत.
अजय व पवन हे दोघे श्रीगोंदे येथून कपडे खरेदी करून काष्टीच्या दिशेने बुलेटने येत होते. यावेळी त्यांना अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.
घटनास्थळी बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते, बंडू जगताप, जयवंत बोत्रे, सूरज राहिंज, प्रशांत भोर, अल्ताफ शेख, अनिल कानडे यांच्यासह तरुणांनी धाव घेतली.
पवन खरात जागीच ठार झाला, तर अजय वाळुंज हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी दौंड येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.
मृताच्या अंगातील शर्टाच्या खिशात श्रीगोंदे येथे कपडे खरेदी केल्याची पावती होती. त्यावर नाव असल्याने मृताच्या कुटुंबातील सदस्यांना संपर्क करण्यात आला.
दोन्ही मृत हे आईवडील यांना एकुलते एक होते. शनिवारी सकाळी शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
