व्हीआरडीई राज्याबाहेर जाऊ देणार नाही : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

। अहमदनगर । दि.10 जानेवारी ।  नगरमधील व्हीआरडीई स्थलांतराची चर्चा आहे. हा प्रश्न नगरचा नसून, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणताही प्रकल्प राज्याबाहेर जाऊ देणार नाही. या संदर्भात लवकरच दिल्ली येथे सर्वपातळ्यांवर प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.

व्हीआरडीई स्थलांतराची प्रयत्नांबाबत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केंद्रीय संरक्षण समितीचे सदस्य खासदार शिंदे यांची ठाणे येथे भेट घेऊन स्थलांतर थांबवावे, अशी विनंती नगरमधील व्हीआरडीई बचाओ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली. यावेळी दुर्गेश गाडेकर, एम. जाधव, पी. जी. गवळी, के. बी. करोसिया आदी उपस्थित होते.

हे निवेदन मंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी नगरच्या व्हीआरडीईसंदर्भात माहिती घेऊन स्थलांतराबाबत आपण केंद्रीय संरक्षण समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करून हे स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न करू. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत लक्ष घालण्यास सांगून खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे सर्व खासदार संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिले.

याबाबत नगरमध्ये शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधून व्हीआरडीई स्थलांतराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी ठाणे येथे शिष्टमंडळास येण्यास सांगितले होते, त्या अनुषंगाने काल ठाणे येथे शिष्टमंडळाने खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post