नवी दिल्ली, (दि.04 डिसेंबर) : देशातील मसाल्याची कंपनी ’महाशिया दी हट्टी’ अर्थात एमडीएचचे मालक आणि मसाला किंग म्हणून प्रसिद्ध असेलल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं. (दि. 3 डिसेंबर) सकाळी पाच वाजून 38 मिनिटांनी वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गुलाटी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरेही झाले होते. परंतु आज सकाळी दिल्लीच्या माता चंदन देवी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
धर्मपाल गुलाटी यांचा मसाल्याचे दुकानदार ते उद्योजक असा प्रवास थक्क करणारा होता. ते 2000 कोटी रुपयांच्या बिजनेस ग्रुपचे मालक होते. महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म 27 मार्च 1923 रोजी पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. इथेच त्यांच्या व्यवसायाचा पाया रचला होता.
त्यांनी आपल्या आयुष्यात फाळणीचं दु:ख, गरिबी पाहिली, टांगा चालवला आणि त्यानंतर मसाल्याचं दुकान सुरू केलं. त्यांच्या मेहनत आणि जिद्दीमुळेच ते मसाला किंग बनवलं. 1947 मध्ये देशाच्या विभाजनानंतर ते भारतात आले.
