कल्याण रोड भाग मनपातून वगळा : मागणी
नगर,(दि.08 डिसेंबर) : कल्याण रोड परिसर हा नगर शहराच्या जवळचा भाग असून या भागात दिवसेंदिवस नागरी वसाहती वाढत आहेत. मात्र, या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून आजवर अनेक आंदोलने करूनही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे कल्याण रोड परिसराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी तसेच या भागातील रहिवासी पालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे भरतात. मात्र, त्यांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही. सुविधा देता येत नसतील तर कल्याण रोड परिसराचा भाग महापालिका हद्दीतून वगळून नजीकच्या ग्रामपंचायतीला जोडून द्या, अशी संतप्त मागणी या भागातील नगरसेवक सचिन भाऊ शिंदे व शाम नळकांडे यांनी केली आहे.
याप्रश्नी शिंदे व नळकांडे यांनी मंगळवारपासून महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, कायमस्वरुपी तोडगा निघेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहाणार असल्याचे उभयतांनी स्पष्ट केले. यावेळी आयुक्तांशी चर्चा करताना शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले की, सत्ताधार्यांकडून सेना नगरसेवकांना निधीच्या बाबतीत सापत्न वागणूक दिली जात आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांना विकासकामांसाठी समान निधी उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा शहर शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, अनिल बोरुडे, अनिल शिंदे, प्रशांत गायकवाड, योगीराज गाडे, संग्राम शेळके, मदन आढाव व कल्याण रोड परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. नगरसेवक शिंदे यांनी सांगितले की, नगर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होतो. मात्र, कल्याण रोड परिसर मनपा हद्दीत असूनही 10 ते 12 दिवसांनी नळाद्वारे तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो.
त्यामुळे या भागाचा विकास खुंटत आहे. या भागातील रहिवासी मनपाची वर्षभराची संपूर्ण पाणीपट्टी भरतात. मात्र, त्यांना केवळ 45 दिवस व तोही अपुरा पाणीपुरवठा होतो, ही बाब अन्यायकारक असल्याचे सचिन शिंदे व शाम नळकांडे यांनी म्हटले आहे.
