नगर, (दि.30 डिसेंबर) : दारू पिऊन शिवीगाळ करणार्या मोहसीन मणियार याला चापट मारल्याचा राग आल्याने त्याने अमीन हारून शेख याच्या मानेवर स्क्रू ड्राइव्हरने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि.24 रोजी सुभाषनगर येथे घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमीनचे किराणा दुकान आहे. तो व त्याचे चार मित्र सायंकाळी धारणगाव रोडवरील माधव बागेसमोर बसले होते. मोहसीन दारू पिऊन त्यांच्या जवळ आला व शिवीगाळ करू लागला. याचा राग शेखने एक चापट मारली. मोहसीनने स्क्रू ड्रायव्हर घेऊन शेखच्या मानेवर वार केला.
यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. मित्रांनी त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे. हारून शेख यांनी 28 डिसेंबरला रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व सहायक फौजदार एस. सी. पवार यांनी घटनास्थळास भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक बोरसे करत आहेत.