छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजन
। सिंधुदुर्गनगरी । दि.12 मे 2025 । छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत शिवरायांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला असून महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक ठरणार असल्याचे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेऊन व पूजन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार नारायण राणे, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, निलेश राणे, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किणी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत पुतळ्याचे काम पूर्ण करुन महाराजांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी अतिशय वेगाने काम केले आहे. ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतारांनी कमी वेळेत आकर्षक आणि देखणा पुतळा साकारला आहे.