नगर, (दि.01 डिसेंबर) : कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेवर कोविड तपासणी बंधनकारक केल्याने भाविकांचा ओघ अंशतः कमी झाला आहे. तरीही अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर साईनगरी भाविकांनी फुलून गेली आहे.
शनिवार, रविवार, सोमवारला जोडून आलेल्या सुटीमुळे भाविकांनी शिर्डीत गर्दी केली. मंदिर परिसराच्या बाहेर भाविकांच्या रांगा दूरवर गेल्या होत्या. मात्र, दर्शनरांगा झटपट पुढे सरकत असल्याने व रांगेत गर्दी, कोलाहल नसल्याने दर्शन आनंददायी झाले आहे.
आता दर्शनरांग समाधीच्या दर्शनापूर्वी द्वारकामाई मंदिरातून फिरवल्याने समाधीपूर्वी बाबांच्या द्वारकामाईचे दर्शन घडत आहे. समाधी दर्शनानंतर भाविक संस्थांनच्या प्रसादालयात प्रसाद घेण्यास प्राधान्य देत असून, रोज पाच ते सहा हजार भाविक प्रसाद भोजन घेत आहेत.
येथे दोन भाविकांमध्ये एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येत आहे. संस्थेच्या भक्तनिवासातही भाविकांचा ओघ वाढला असून, एक दिवस खोली वापरल्यानंतर दुसर्या दिवशी बंद ठेवण्यात येत आहे. रोज स्वच्छ कपडे व सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.
