रेखा जरे खून प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती नगरचा डॉ.नीलेश विश्वासराव शेळके सापडला असून, त्याची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी डॉ.शेळके याला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, बँकेच्या फसवणूकप्रकरणी डॉ. शेळके याला अटक केली आहे.
नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये 2018 मध्ये डॉ.रोहिणी सिनारे यांनी फसवणुकीची फिर्याद दाखल केली होती. पाच कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले होते. शेळके याने हॉस्पिटलला मशिनरी खरेदी करण्यासाठी बँकेकडून माझ्या नावाने कर्ज घेतले होते.
मात्र मशिनरी खरेदी न करता माझ्या अकाउंट वरून त्यांनी परस्पर पैसे काढून अपहार केला व फसवणूक केली, असे त्या फिर्यादीत म्हटले होते. हा गुन्हा नंतर स्थानिक आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला होता. या गुन्ह्यामध्ये एकूण 25 आरोपी असून यामध्ये अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा सुद्धा समावेश आहे.
ही घटना घडल्यानंतर या घटनेतील आरोपी डॉ. नीलेश शेळके याने अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेथे शेळके याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. शेळके हा त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेला, तेथेही त्याचा अर्ज फेटाळला गेला होता. त्या दिवसापासून शेळके हा फरार होता.