नगर, (दि.27 डिसेंबर) : रात्रीच्या वेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी सुपा पोलिसांनी जेरबंद केली असून त्याच्याकडुन दरोड्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी या पाच दरोडेखोरांकडून रोख रक्कम, मिरचीपूड, एक धारदार सुरा आणि दोन मोटार सायकल असा ऐवज जप्त केला आहे. ही पाच जणांची टोळी नगर-पुणे रोडवरील जातेगाव घाटात अटक केली आहे.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे नयन राजेंद्र तांदळे (वय 26 वर्षे रा. भिस्तबाग चौक, अहमदनगर) विठ्ठल भाऊराव साळवे (वय 27 वर्ष ) अक्षय बाबासाहेब ठोंबरे (वय 23 वर्ष रा. प्रेमदान चौक अहमदनगर) राहुल अशोक पवार (वय 31 वर्ष रा. सुपा ता.पारनेर) अमोल छगन पोटे (वय 28 वर्ष रा.सुपा ता.पारनेर) अशी सांगितले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुपा पोलीस ठाण्याचे पथक नगर पुणे रोडवर गस्त घालत असताना जातेगाव घाटात काहीजण लपून बसल्याची माहिती त्यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे त्यांनी या परिसरात गस्त घालत असताना पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या बाजूला पाच जण न्यू बब्बी पंजाबी धाब्याच्याजवळील घाटात रस्त्याच्या कडेला अंधारात दबा धरून बसलेले आढळून आले.
या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन मोटारसायकल (शाईन एमच 16 बीए 5640 व स्प्लेडर एमएच 16 एयु 3174) रोख रक्कम, मिरचीपूड व व एक धारदार सुरा असे साहित्य आढळून आले.