अनलॉक स्टोरी 1.0 लघुपटाची यशस्वी भरारी
नगर,(दि.07 नोव्हेंबर) : कोरोना जनजागृतीपर सामाजिक संदेश देणार्या व नगरी मातीत चित्रित झालेल्या ‘अनलॉक स्टोरी 1.0’ या प्रबोधनात्मक लघुपटाने उत्तर प्रदेशमधील झांशी येथे आयोजित महाराजा अग्रसेन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चांगली भरारी घेतली. या लघुपटाचे कृष्णा बेलगावकर यांना ‘उत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार जाहीर झाला. या महोत्सवात देश-विदेशातील 90 लघुपटांची निवड झाली होती. कोरोना जनजागृतीवर आधारित असलेला हा नगरमधील पहिलाच लघुपट आहे
गेले कित्येक दिवस कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अगतिक झालेली मानव जात आणि या संकटाचे जागतिक स्रावर होत असलेले परिमाण यामुळे समाजात खूपच संभ्रम निर्माण होत गेला. संचारबंदीमुळे अनेकांचे रोजीरोटीचे प्रश्न उपस्थित होत असल्याने अनलॉक करण्याचा निर्णय घ्यावा लागला मात्र या अनलॉक प्रक्रियेचा चुकीचा अर्थ घेत तरुण पिढी कशी सौर होत गेली, त्याचे काय परिणाम झाले याचे चित्रण या लघुपटात केले आहे. गेल्या 14 ते 18 ऑक्टोबर दरम्यान झांशी येथे आयोजित या आंतरराष्ट्रीय महोत्सवात देश-विदेशातील 90 फिल्मचा सहभाग होता. यामध्ये उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून कृष्णा बेलगांवकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. महोत्सवाचे समन्ययक डॉ. अलोक सोनी यांनी नुकतीच या पुरस्कारांची घोषणा केली.
प्रासंगिक विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून सामाजिक संदेश अधोरेखीत करणारा हा लघुपट गेल्या सप्टेंबर महिन्यात यूट्युबवर प्रदर्शित झाला असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत तसेच वेगवेगळ्या स्त्रावर त्याचे विशेष कौतुक होत आहे. कोरोना जनजागृतीवर भाष्य करणारा ‘अनलॉक स्टोरी 1.0’ हा नगर शहरातील एकमेव लघुपट असून ‘रंगभूमी एन्टरटेन्मेंट’ या संस्थेने सदर लघुपटाची निर्मिती केली आहे. या लघुपटात विराज अवचिते, उत्कर्षा बोरा, वृषभ कोंडावर आणि ऋषिकेश वाखारे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
तर चित्रीकरण भूषण गणूरकर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता विठ्ठल राक्षे, प्रकाश योजना रुपेश चव्हाण, कला दिग्दर्शन ऐश्वर्या ढवळीकर, ध्वनी संकलन सिद्धांत खंडागळे, विक्रांत ढवळीकर, वेशभूषा कल्याणी गाढवे, प्राची शेकटकर तर निर्मिती व्यवस्थापन ज्ञानेश्वर राऊत यांचे आहे. लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन कृष्णा बेलगांवकर यांनी केले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेल्या भीतीच्या वातावरणात या लघुपटाची निर्मिती केली गेली. यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासन, तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी बाबासाहेब खराडे, निवेदक शशिकांत जाधव, संदीप जाधव, श्रीकांत वाखारे, अनुपमा वाखारे याचे मोलाचे सहकार्य लाभले.
Tags:
Ahmednagar
