जेजुरी, (दि.16 नोव्हेंबर) : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरीतील खंडेरायाचे मंदिरदेखील भाविकांसाठी आजपासून दर्शनाला खुले करण्यात आले आहे. आज पहाटे जेजुरी गडावर भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात मंदिर उघडण्यात आले. यावेळी गडावर पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप आणि राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. आज मंदीर सुरु करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
एका विशिष्ट वेळेत १०० भाविकांना टोकन देऊन मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे. मंदिरात गर्दी होणार नाही याची पूर्ण खबरदारी मंदिर प्रशासनाने घेतली असून सॅनिटायझर, थर्मामीटरवर तापमान चेक करूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. अनेक महिन्यांनंतर मंदिर उघडले असल्याने आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी भाविक गडावर दाखल होत आहेत.
पहाटे मंदिर खुले करताना देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त प्रसाद शिंदे, विश्वस्त संदीप जगताप, पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, देवाचे मानकरी, पुजारी सेवक वर्ग नित्यसेवेकरी वारकरी उपस्थित होते. मंदिर उघडल्याने पेठेतील दुकाने उघडली असून विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले.
